कथन केले पाच वर्षांतले अनुभव
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेत निवडून आलेल्या 73 सदस्यांची पहिल्या पंचवार्षिकमधील शेवटची महासभा बुधवारी (दि. 6) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. या वेळी सर्व सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेनंतर नगरसेवकांच्या निरोप समारंभ झाला. या वेळी अनेक सदस्य पाच वर्षांतील अनुभव सांगताना भावूक झालेले दिसले.
पनवेल महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. महानगरपालिकेची पहिली महासभा 10 जुलैला झाली होती. बुधवारी महापालिकेची 50वी महासभा घेण्यात आली. महासभेत 16 विषय मंजूर करण्यात आले. सभेचे कामकाज संपल्यावर सर्वांचा एकत्र फोटो काढण्यात आला. भोजनानंतर, पुन्हा सभागृहात आलेल्या सदस्यांनी पाच वर्षांत आलेले अनुभवांचे कथन निरोपाच्या कार्यक्रमात केले.
उपमहापौर सीताताई पाटील आणि स्थायी समिती सभापती नरेश पाटील, आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सब का साथ, सबका विकास हेच मी सुरुवातीला सांगितले होते. त्याचा प्रत्यय मला सभागृहात आल्याचे सांगितले. पाच वर्षांत विकासाची अनेक कामे केली. झोपडपट्ट्यांचा विकास, माता बाल संगोपन केंद्रासाठी सिडकोकडून भूखंड, महिलांच्या आरोग्यासाठी शिबिर, मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण, शिवाजी चौकातील सुशोभीकरण, क्रिकेट प्रशिक्षण केंद्र यासारखी कामे मार्गी लागली, स्वच्छता सर्वेक्षणात मिळालेले बक्षीस याचा नक्कीच अभिमान वाटतो. महिलांसाठी हक्काचे म्हणून महिला बाल संगोपन केंद्राच्या कामाचा मी पाठपुरावा केला ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे सांगून सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व तुम्ही सर्व सदस्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, त्यांचे सहकारी व कर्मचार्यांनी त्यासाठी घेतलेली मेहनत यामुळे विकासकामे करणे शक्य झाले. लोकनेते रामशेठ ठाकूऱ व आमदार प्रशांत ठाकूर यांनी दोनदा संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन आणि सर्व सदस्यांचे आभार मानले.
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी, आयुक्त गणेश देशमुख यांचे मनापासून आभार मानले. शहरी भागाबरोबरच नव्याने महापालिकेत सामील झालेल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठीही आम्ही प्रयत्न केले. पनवेलमधील युवा पिढीसाठी अभ्यासिका, अंतराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. पनवेल शहराला जागतिक किर्तीचे शहर बनविण्यासाठी यापुढेही प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले. आपल्याला निवडून दिलेल्या, आपल्यावर विश्वास ठेवलेल्या पनवेलकरांचे, महापालिकेच्या सर्व अधिकार्यांचे, महापौर, विरोधी पक्षनेते, नगरसेवक या सर्वांचे आभार मानले.
आयुक्त गणेश देशमुख यांनी, आजवर काम करताना सदस्यांचे आलेले अनुभव सांगितले. भविष्यात महापालिकेने विकासाचे टार्गेट ठेवून काम केले पाहिजे, असे सांगून सभागृह नेते परेश ठाकूर यांचे विशेष कौतुक केले. आपल्या कारकिर्दीत असा सभागृह नेता पाहिला नसल्याचे सांगितले.