मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रांत महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणार्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 8) येथे केले.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत संकल्प ते सिद्धी (नवा भारत, नवे संकल्प) परिषद हॉटेल द ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ना. नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई पुणे एक्स्प्रेस वे असेल किंवा वेगवेगळे उड्डाणपूल असोत यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृद्धी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणार्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रोड कनेटिव्हिटीचे जाळे निर्माण होणार आहे. महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प आणि योजना राबवित असताना आणि एकात्मिक प्रगती साध्य करीत असताना शेवटच्या घटकापर्यंत ही मदत पोहचणे यावर भर देण्यात येणार आहे.
नरिमन पॉइंट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या 12 तासांत पूर्ण करता येईल असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा महामार्ग जेएनपीएपर्यंत जाणार असून याचे बहुतांश सर्व काम सुरू करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे काम असेल किंवा मग महाराष्ट्रात आणि मुंबईत मेट्रो सेवा सुरू करणे, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प सुरू केले, तर मुंबई हा देशाशी जोडला जाण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.
राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणार्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर आपण भर देणे गरजचे आहे. इथेनॉलला येणार्या काळात पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जाउत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, याकडे ना. गडकरी यांनी या वेळी लक्ष वेधले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणार्या समृद्धी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह राज्यातील प्रत्येक क्षेत्रावर लक्ष देण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही जसे संतांचीआणि देवांची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशीसुद्धा ओळख असून ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. केंद्र शासनाबरोबरच आमचे शासनसुद्धा येणार्या काळात नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने कसे पूर्ण होईल यासाठी काम करीत आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याबरोबरच मुंबई मेट्रोचे कामही प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर असेल.
या वेळी सीआयआयचे पदाधिकार्यांनी या कार्यक्रमाचे आणि परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …