बसमालक संघटनेची राज्य शासनाकडे मागणी
पनवेल : वार्ताहर
कोरोनाच्या निर्बंधामुळे रायगड जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई परिसरातील वाहतूकदारांचे मोठे नुकसान झालेले असून राज्य शासनाने योग्य मार्ग काढून हे नुकसान भरून देण्यात यावे, अशी मागणी मुंबई बसमालक संघटनेने महाराष्ट्र शासन तसेच रायगड जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय रायगड येथे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोविड-19च्या निर्बंधामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजलेला असून आमची प्रवासी बस वाहतूक सेवा 24 मार्चपासून बंद आहे. त्यामुळे वाहतूकदारांची आवक संपूर्णपणे बंद झालेली असून आमच्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेले व्यवसायसुद्धा ठप्प झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या व्यवसायात आवश्यक असलेले ड्रायव्हर, क्लिनर, तसेच ऑफिस स्टाफ इ. वर्गालासुद्धा आर्थिक झळ बसलेली आहे. त्यामुळे त्यांच्या व आमच्या कुटूंबियांचे पालन करणे कठीण झाले आहे.
बसचालक सर्वात जास्त रोडटॅक्स भरतात. त्यामुळे आम्हाला किमान एक वर्षाचा रोड (आरटीओ) टॅक्स माफ करण्यात यावा. कारण त्यामुळे किमान सहा महिने तरी आमचा व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी कालावधी लागेल, बसेसचा सहा महिन्यांचा इंशुरन्स कालावधी वाढवून देण्यात यावा, पुढील काळात सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार असून 50टक्के प्रवासी घेता येतील त्यानुसार सरकारने रोडटॅक्ससुद्धा 50टक्के घ्यावा, बँकांचे कर्जावरील सहा महिन्यांचे व्याज माफ करण्यात यावे, बस कार्यालयातील कामगार, ड्रायव्हर, क्लिनर यांच्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी, किमान एक वर्ष जीएसटी कर माफ करण्यात यावा, बस कर्मचार्यांना कोरोना योद्धा घोषित करून 50 लाखांचे विमा संरक्षण जाहिर करण्यात यावे, लक्झरी बस मालकांचा व्यवसाय तारण्यासाठी बस वाहतूकदारांना मदतीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, महाराष्ट्र राज्या शेजारील इतर राज्यात काही मागण्या पूर्ण देखील झाल्या आहेत, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड या राज्यात सहा महिन्यांचा कालावधी रोडटॅक्स पूर्णपणे माफ झाला आहे.
बस मालकांमुळे बँका कमवून मोठ्या होतात. सरकार आमच्याकडून रोड टॅक्स, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, जीएसटी टॅक्स घेऊन आपली तिजोरी भरतात. पेट्रोल पंप मालक, मोटार कंपनीचे मालक, गॅरेज मालक, ऑनलाईन बुकींग साईट इ. मोठे होतात. मात्र नेहमीच बस मालक कायम दुर्लक्षीत राहतो. आता संयम सुटला असून वाहतूकदारांजवळील पैसेही संपले आहेत.
आरटीओ टॅक्स मागत आहे. बँक इएमआय मागत आहे, कर्मचारी पगार मागत आहेत. मुलांच्या शाळेची फी, घराचा किराणा माल भरायचा आहे. अशा अडचणींमुळे माझ्यासारखे अनेक बसमालक व्यावसायिक हैराण झाले आहेत. शासनाने या मागण्यांकडे सहानुभूतीने पाहून मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी मुंबई बसमालक संघटना रायगड विभागाने शासनाकडे केली आहे.
-समीर माखेजा, बसमालक व्यावसायिक