
मुंबई : प्रतिनिधी
सांताक्रूझमध्ये सरकत्या जिन्यांचा स्कायवॉकचे भूमिपूजन करण्यात आले. सांताक्रूझ पूर्वेला नेहरू रोड येथे असलेला हा मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक असेल व त्यामुळे पादचार्यांचा त्रास वाचणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधले असले तरी ते खूप उंचावर असल्याने त्याचे जिने चढून जाणे त्रासदायक ठरते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अपंगांना तर त्याचा वापरच करता येत नाही. एमएमआरडीएने बांधलेले हे स्कॉयवॉक आता पालिकेच्या ताब्यात आहेत. पालिकेने यापुढे सर्वच पादचारी पूल, स्कायवॉक, भुयारी मार्गांवर सरकते जिने बसवण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून सांताक्रूझ येथे मुंबईतील पहिलावहिला सरकत्या जिन्याचा स्कायवॉक बांधण्यात येणार आहे. या स्कायवॉकची लांबी 500 मीटर, रुंदी 4 मीटर असेल. या स्कायवॉकच्या बांधकामाचा एकूण खर्च 20 कोटी 16 लाख 57 हजार इतका आहे. पावसाळा सोडून 18 महिन्यांत या स्कायवॉकचे काम पूर्ण होणार आहे.