Breaking News

आषाढी एकादशी-ईदनिमित्त पालीत घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन!

अल्पोपाहार वाटपातून दिला सामाजिक समतेचा संदेश

पाली ः प्रतिनिधी

यंदा हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी सोहळा आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण रविवारी (दि. 10) योगायोगाने एकाच दिवशी आले. यानिमित्त पाली येथे हिंदू-मुस्लिम बांधव ऐक्याचे अनोखे दर्शन घडले. या वेळी मुस्लिम बांधवांनी वारकरी बांधवांना अल्पोपाहाराचे वाटप केले, तर दोन्ही समाजाच्या बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक समतेचा संदेश दिला. पालीतील हिंदू-मुस्लिम बांधव नेहमीच आपापल्या धर्मातील सण, उत्सव एकत्रित येऊन साजरे करताना दिसतात. प्रेमाने जग जिंकता येते, सर्वधर्म समभाव जपला व ऐक्यभावना मनात रुजवली, तर आपला देश जगाला हेवा वाटावा अशी प्रगती साधेल, असे मत सुएसोचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये यांनी या वेळी व्यक्त केले, तर सभापती सुलतान बेनसेकर म्हणाले की, येथील हिंदू मुस्लिम बांधव नेहमीच एकमेकांचा आदर राखत सण व उत्सव एकोप्याने व शांततेत साजरे करतात. संपूर्ण जिल्ह्याला आदर्शवत ठरावे असे ऐक्य पालीसह सुधागडात दिसून येते. एकमेकांच्या धर्माचा आदर व सन्मान राखण्यातच आपण भारतीय असल्याचा अभिमान व भारतीय संविधानाचा खरा गौरव आहे. या वेळी चंद्रकांत घायले, श्री. गायकवाड, संतोष कांबळे, बबली शिंदे, सखाराम दिघे, अखिल फणकर, इमदाज पठाण, इजाज पानसरे, इसाक पानसरे, पप्पू परबलकर आदींसह हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत आदरभाव राखला.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply