पेण ः प्रतिनिधी
पेणमधील महिलेच्या बेकायदा गर्भपातप्रकरणी दादर पोलिसांनी दोन फरारी आरोपींना अटक केली आहे. देवता भोईर व विनायक भोईर अशी त्यांची नावे आहेत. पेण तालुक्यातील जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून 16 आठवड्यांचा गर्भ नष्ट करण्यात आला. यामध्ये या विवाहितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मृत महिलेचा पती, सासू व डॉ. धुमाळ यांना पोलिसांनी तातडीने अटक केली, पण मृत महिलेची नणंद देवता भोईर व तिचा पती विनायक भोईर हे दोघे फरारी होते. या दोन्ही आरोपींना नागोठणे येथून त्यांच्या मित्राच्या घरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन्ही फरारी आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांच्या राहत्या घरी राहत नव्हते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके बनवली होती. दोन्ही आरोपींनी स्वतःकडील मोबाइल बंद करून ठेवले असल्याने त्यांना ट्रॅक करणे कठीण झाले होते. वाशी, वढाव, पेण, मुरूड व रोहा या ठिकाणी आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला. तपासादरम्यान आरोपी त्याच्या मित्राकडे नागोठणे येथे असल्याची खबर पोलिसांना मिळताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंदराव पाटील यांच्या पथकाने तेथून त्यांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.