पनवेल : प्रतिनिधी : पनवेलच्या सीकेपी समाजाच्या पुरातन लक्ष्मी-नारायण मंदिरात शनिवारी दुपारी पारंपरिक पद्धतीने रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी वाचनालयाचे उद्घाटन आणि महाप्रसाद करण्यात आला.
पनवेलच्या प्रभू आळीतील सीकेपी समाजाच्या 400 वर्षापेक्षा जुन्या लक्ष्मी-नारायण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि श्रीराम जन्मोत्सव 90 पेक्षा जास्त वर्षे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. शनिवार 13 एप्रिल रोजी सकाळी संस्थेचे अध्यक्ष आशीष गुप्ते आणि त्यांच्या पत्नी अनघा गुप्ते यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या पूजेचे पौरोहित्य निरंजन गुप्ते यांनी केले. त्यानंतर महिला मंडळाच्या रश्मी महाजन, वैशाली कुळकर्णी, स्मिता सबनीस, अनघा गुप्ते, कविता चित्रे आणि दीप्ती शृंगारपुरे यांचे भजन झाले. 12.39 वाजता समाजातील भगिनींनी पाळणा म्हणून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर सुंठवडा आणि आणलेला प्रसाद उपस्थितांना वाटण्यात आला.
समाजात वाचनाची आवड कमी होत असल्याने वाचनाची गोडी लागण्यासाठी वाचनालय सुरू करण्याची कल्पना अध्यक्ष आशीष गुप्ते यांनी मांडली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळून अनेकांनी आपल्याकडील पुस्तके दान केली. त्या वाचनालयाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त उल्हास शृंगारपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद करण्यात आला. या वेळी निरंजन गुप्ते, प्रकाश कुळकर्णी, मकरंद कर्णिक, योगेश राजे, श्रीकृष्ण चित्रे, श्रीनिवास कुळकर्णी, क्रांतिकुमार कुळकर्णी, मथुरे आणि महिला मंडळाच्या सदस्या या वेळी उपस्थित होत्या.