एकाच रात्री 12 दुकाने फोडली; हजारो रुपयांचा माल लंपास
कर्जत : बातमीदार
नेरळ शहरात दोन दिवसांपूर्वी तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना कर्जत शहरात मंगळवारी (दि. 7) रात्री 5 ठिकाणी आणि नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्या साई मंदिर परिसरात 5, पोशिर येथे 1 तर डिकसळ येथे 1 मेडिकल अशी सुमारे 12 दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. या दुकांमधून हजारो रुपयांचा माल लंपास करण्यात आला आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.
नेरळ साईमंदिर परिसरात साई इलेक्ट्रॉनिकल्स, मोबाईल रिचार्ज सेंटर, स्टेशनरी, कापड्याचे दुकान, पोशीर बस स्टॉपवरील किराणा दुकान, डिकसळ येथील मेडिकल स्टोअर, तर कर्जत चारफाटा येथील एक दुकान, कर्जत स्वप्ननगरीमधील दोन दुकाने, एक मेडिकल स्टोअर, आणि कर्जत पोलीस ठाण्यासमोरील कपड्याचे दुकान फोडून चोरट्यानी काही कपडे लांबविले. तर या एकूण 12 दुकानातून चोरट्यांनी हजारो रुपयांची रक्कम तसेच माल लंपास केल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीमध्ये तीन बाईक घेऊन चोरी करताना दिसून आले आहेत. एकूणच नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोर्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस या चोरांचा कशा प्रकारे शोध घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. दोन दिवसांतुन दुकाने फोडण्याचे प्रकार सुरू असल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत.