Breaking News

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून‘हारक्युलस’च्या कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सुविधा

कंपनी व कामगार यांचे ऋणानुबंध महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील धामणी येथे असलेल्या हारक्युलस हॉईस्ट लिमिटेड कंपनीमधील कामगारांना भरघोस पगारवाढ व सोयीसुविधा देण्याचा करार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 15) झाला. या वेळी त्यांनी कंपनी आणि कामगार यांचे ऋणानुबंध महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. या कार्यक्रमाला अनपेक्षितपणे रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांची विशेष उपस्थिती लाभली. या वेळी कंपनीतर्फे व्हाईस चेअरमन विवेक महेंद्रु व सेक्रेटरी किरण मुकादम, संघटनेतर्फे अध्यक्ष जितेंद्र घरत, सचिव समिरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, चंद्रकांत कडू, युनिट अध्यक्ष विशाल बारस्कर, उपाध्यक्ष अविनाश जाधव, सरचिटणीस अल्ताफ शेख, चिटणीस कल्पेश मांडलेकर, खजिनदार कल्पेश मेहेतर, सहखजिनदार रवींद्र कुडपाने, सदस्य राम जाधव आदी उपस्थित होते. चार वर्षांसाठी झालेल्या करारानुसार कामगारांना 12 हजार 500 रुपयांची दरमहा पगारवाढ (पहिल्या वर्षी 4200, दुसर्‍या वर्षी 3200, तिसर्‍या वर्षी 3100 व चौथ्या वर्षी 2000 रुपये), 30 हजार रुपये बोनस, तीन लाख रुपयांची फॅमिली मेडिक्लेम पॉलिसी, सणांसाठी 70 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स, कामगारांना वार्षिक सहल, त्याचबरोबर रजा व इतर सेवा सुविधा मिळणार आहेत. या कराराचा 43 कामगारांना लाभ मिळणार असून त्याबद्दल कामगारांनी संघटना व कंपनीचे आभार मानून आनंद व्यक्त केला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जय भारतीय जनरल कामगार संघटना फार चांगले काम करीत आहे. कंपनी आपल्या कामगारांना सर्व सुविधा देत आहे, तर आपणदेखील कंपनीला उत्पादन वाढीसाठी मदत केली पाहिजे हा चांगला उद्देश ठेवून कामगारही काम करीत आहेत. त्यामुळे कंपनी आणि कामगारांची उन्नती होत आहे. कंपनी आणि कामगार यांचे ऋणानुबंध महत्त्वाचे ठरत असून औद्योगिक क्षेत्राच्या हितासाठी ही उत्तम बाब असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.

कंपनी आणि कामगारांचा आदर्श उद्योग क्षेत्रासाठी लाभदायक -कामगार नेते जितेंद्र घरत

या वेळी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी करारासंदर्भात माहिती देताना सांगितले की, जय भारतीय जनरल कामगार संघटना स्थापन झाल्यानंतर पहिली संघटना हारक्युलस कंपनीत स्थापन झाली. कंपनी व कामगार यांचे संबंध एवढे चांगले आहेत की, गेल्या सहा वर्षांत एकदाही वाद निर्माण झाला नाही. प्रत्येक वेळी कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास गुण्यागोविंदाने मार्ग निघतो. कामगारदेखील अशा प्रकारे काम करतात की कंपनीला कधीच नाव ठेवायला जागा नसते. त्यामुळे कंपनी आणि कामगारांचा आदर्श उद्योग क्षेत्रासाठी लाभदायक आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply