मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी (दि. 3) जाहीर केला. रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने विश्वचषक संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर व्यक्त केलेली नाराजी रायुडूला भोवल्याची चर्चा आहे.
धवन व शंकर माघारी फिरूनही रायुडूच्या नावावर काट मारत बीसीसीआयने ऋषभ पंत व मयांक अगरवाल यांना लंडनला पाठवले. त्यामुळे रायुडू नाराज होता. त्याने विजय शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती, पण अखेरीस त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.
33 वर्षीय रायुडूने 55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतके व 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
धोनी रिटायर्ड होतोय?
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संथ खेळी करणार्या महेंद्रसिंह धोनी याच्यावर चौफेर टीका सुरू असताना, आयसीसी वर्ल्डकप 2019नंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्येच धोनी आपला शेवटचा सामना खेळेल, असे वृत्त पीटीआयने एका बीसीसीआयच्या अधिकार्याच्या हवाल्याने दिले आहे.