Breaking News

राष्ट्रपतिपद निवडणुकीसाठी आज मतदान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 18) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)कडून झारखंडच्या माजी राज्यापाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विरोधी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)कडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. राजकीय गणित पाहता मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. देशाच्या 15व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. सुमारे 4800 खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या निवडणुकीतील मतदानादरम्यान खासदारांना हिरव्या, आमदारांना गुलाबी रंगाची मतपत्रिका देण्यात येणार आहे, जेणेकरून मतमोजणी करणे सोपे व्हावे. 21 जुलै रोजी मतमोजणी झाल्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड दिसत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांच्या यूपीएने उपराष्ट्रपदासाठी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा रविवारी (दि. 17) केली. विशेष म्हणजे एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार्‍या शिवसेनेने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मात्र यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. यावर आता शिवसेनेचे इतर खासदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी एनडीएकडून उपराष्ट्रपतिपदासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल ‘शेतकरीपुत्र’ जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 11 ऑगस्टला मतमोजणी आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply