कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी झाली होती, त्यात चिकनपाडा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेथील रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता आणि त्यासोबत रस्त्याला असलेल्या संरक्षक भिंतीही कोसळलेल्या होत्या. त्या सर्व कामांची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची होती, मात्र गेल्या तीन महिन्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण केलेली नाहीत. नुकसानग्रस्त शेतकर्यांनाही कोणत्याही प्रकारची मदत शासनाने केली नाही.
नेरळ-कळंब रस्त्यावर चिकनपाडा गाव असून त्या गावातून माले गावाकडे जाणारा रस्ता आहे. त्यामध्ये पोश्री नदी वाहत असून त्या नदीवर पूल बांधण्यात आला आहे. यावर्षी पावसाळ्यात सलग अतिवृष्टी झाली होती. त्यात चिकनपाडा – माले हा रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे त्यावेळी अलीकडे असलेली आणि पलीकडे असलेली गावे एकमेकांपासून दूर झाली होती. त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी अध्यक्षांनी त्याठिकाणी येऊन तात्काळ रस्ता तयार केला जाईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र तेथील रस्त्यात पाईप टाकून वाहतूक सुरु करण्यात आली होती. त्याच पावसात तेथे रस्त्याला असलेली संरक्षक भिंत कोसळली आणि वाहून बाजूच्या शेतात गेली होती. ती कोसळलेली भिंत आजपर्यंत तेथून बाजूला करण्यात आलेली नाही तसेच तेथील शेतांमध्ये गेलेली माती आजही तशीच आहे.
रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज होती. मात्र आजतागायत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम सुरु झालेले नाही. तसेच कोसळलेल्या संरक्षक भिंतीं बांधण्याचे जिल्हा परिषदेचे कोणतेही नियोजन दिसून येत नाही. याबाबत परिसरातील शेतकरी नाराज असून त्या रस्त्याची दुरुस्ती होणार का? शेतकर्यांना मदत मिळणार का? असे अनेक प्रश्न आजतरी
अनुत्तरीत आहेत.
पावसाळ्यात वाहून गेलेल्या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. कोसळलेल्या संरक्षक भिंतीबाबत मदत देण्याचा अधिकार हा महसूल खात्याचा आहे. -प्रल्हाद गोपणे, प्रभारी उपअभियंता, रायगड जिल्हा परिषद