शालेय मंत्रिमंडळ निवड करण्यासाठी प्रतिकात्मक इव्हीएम मशीनचा वापर
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या तिघर शाळेमध्ये प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना या मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने तिघर (ता. कर्जत) येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी ईव्हीएम मशीन प्रतिकृतीच्या सहाय्याने शाळेच्या मंत्रिमंडळाची निवडणूक घेतली. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला. शाळेचे मुख्याध्यापक भगवान इंगळे, विषय शिक्षिका सविता खडे, योगिता अहिरराव, उपक्रमशील शिक्षक जनार्दन पजई यांनी सर्व विद्यार्थ्यांना निवडणूक पक्रियेविषयी मार्गदर्शन केले. शालेय मंत्रिमंडळ निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.