कळंबोली ः प्रतिनिधी
खांदा कॉलनीतील झाडे ही मोठ्या प्रमाणात उंच व विस्तीर्ण आहेत. या झाडांची निगा राखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नसून झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याकरिताही नेहमीच टाळाटाळ केली जाते. पावसाळ्यात वादळी वार्यामुळे ही झाडे खाली येऊन मनुष्य व आर्थिक हानी होऊ शकते. तेव्हा या विभागातील अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांच्या फाद्यांची छाटणी करण्याची मागणी सभापती संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. लवकरच मान्सून पर्वास सुरुवात होणार असून या कालावधीत होणार्या अतिवृष्टी तसेच वादळी वार्यामुळे सदर झाडांच्या फांद्या तुटून आर्थिक व जीवितहानी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी वादळी वार्यासह कोसळलेल्या अतिवृष्टीत खांदा कॉलनीत अनेक ठिकाणी झाडे खाली आली होती. साई प्रसाद ते खांदेश्वर पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता झाडे पडल्याने दोन दिवस बंद होता. या वेळी जीवितहानी झाली नसली तरी काही जण जखमी झाले होते. चारचाकी, रिक्षा व मोटरसायकलवर झाडे पडून आर्थिक नुकसान झाले होते. दोन-तीन दिवस वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांचे हाल झाले होते. याचा गांभीर्याने विचार करून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 15, खांदा कॉलनी परिसरातील झाडांच्या वाढलेल्या व धोकादायक फांद्यांची मान्सूनपूर्व छाटणी करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.