Breaking News

नवीन पनवेल उड्डाणपुलावर भाजपचे रास्ता रोको

रविवारपर्यंत खड्डे भरणार; सिडको प्रशासन नरमले

पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल उड्डाणपुलाचे खड्डे भरण्यासाठी भाजपतर्फे भर पावसात रास्ता रोको करण्यात आले. यानंतर रविवारपर्यंत भरणार व रस्त्याच्या चारी बाजूच्या सिमेंट काँक्रेटीकरणाची निविदा आठवड्याच्या आत काढण्याचे आश्वासन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना फोन करून दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी सिडकोने लोकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास आम्हाला अशी आंदोलने वारंवार करावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता पुलावर भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात  आले. नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणार्‍या या उड्डाणपुलाची पावसामुळे दूरवस्था झाली आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहेत, तर काहींना कायमचे  जायबंदी व्हावे  लागत आहे. या पुलावरील रहदारीचा विचार करता पूलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट  काँक्रेटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दिड तास रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे सुकापूर, आदई सर्कलपर्यंत व महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, संतोष शट्टी, तेजस कांडपिळे, नितिन पाटील, अजय बहिरा, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सुशीला घरत, वृशाली वाघमारे, राजश्री वावेकर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, हरिष मोकल, भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, पप्पू साळवे, कार्यकर्ते, नवीन पनवेल व खांदा कॉलनीतील अनेक सोसायट्यांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
आंदोलकांनी रस्ता अडवल्यावर सिडकोचे  बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आमदारांना भेटून, आम्ही दोन महिन्यात टेंडर प्रोसेस सुरू करतो, तुम्ही आंदोलन मागे घ्या सांगत होते, पण त्याला नकार देऊन सर्वांनी पावसात रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. सुकापूर, आदई सर्कल पर्यंत व महामार्गावर लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन पनवेलला येणार्‍या मार्गावरील वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या विनंतीनुसार काही वेळ सुरू करून दिली होती. शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी भारतीय जनता पक्षातर्फे पोलीस आणि आंदोलकांचे आभार मानले.

संदीप पाटील यांनी पत्र देऊन सहा दिवस झाले तरी सिडकोचे अधिकारी उत्तर देत नाही. हा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरीत झाला नसल्याने त्याचे काम महापालिका करू शकत नाही. त्यामुळे हे काम सिडकोनेच करायला पाहिजे. सिडकोने आपल्या कारभारात सुधारणा करणे गरजेचे आहे. अशीच समस्या खांदा कॉलनी, पोदीच्या भुयारी मार्गाची व या भागातील पाण्याची आहे त्यासाठी आम्ही पोलिसांना पत्र देऊन आंदोलनाचा इशारा आता देणार आहोत. आपण सर्व वेळ काढून आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. नागरिकांना त्रास सहन करायला लागला त्याबद्दल ही दिलगिरी व्यक्त करतो. रविवारी खड्डे न भरल्यास सोमवारी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णिय घेऊ.
-प्रशांत ठाकूर, आमदार तथा रायगड जिल्हाध्यक्ष, भाजप

नवीन पनवेलला जोडणार्‍या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होतात, अनेक जण जखमी होतात. वाहनांचेही नुकसान होते. पुलाच्या दोन्ही बाजूला उतारावर चौक असल्यास तेथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करायचे असते हे सिडकोला व त्यांच्या अधिकार्‍यांना माहित नाही का? दरवर्षी पावसाळ्यात तात्पुरती दुरूस्ती केली जाते. मी स्वत: मागील वर्षी आणि यावर्षी जुलैमध्ये डांबर टाकून खड्डे भरले होते. सिडकोच्या अधिकार्‍यांना लोकांशी काही देणे – घेणे नसल्याने आम्हाला असे आंदोलन करावे लागले.
-परेश ठाकूर, माजी सभागृह नेते, पनवेन मनपा

नवीन पनवेलला जोडणार्‍या पुलाच्या दोन्ही बाजूला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. यासाठी आम्ही नवी मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक चौकात सिमेंट  काँक्रेटीकरण करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दोन वर्षे करीत आहोत, पण सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आम्हाला हे आंदोलन करावे लागले.
– संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष तथा शहर उपाध्यक्ष, भाजप

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply