कर्जत : प्रतिनिधी
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षय्य तृतीयेपासून सुरू झाला. त्यानिमित्ताने शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या कुस्तीच्या आखाड्यात आयोजित केलेल्या कुस्त्यांमध्ये गेल्या वर्षी अजिंक्य ठरलेला रसायनीचा विशाल कोकरे आणि दिल्लीचा मनजीत यांच्यात कुस्ती रंगली, परंतु कुस्ती ऐन रंगात आली असता मनजितने अचानक आखाडा सोडल्याने विशालला विजयी घोषित केले, तर चार कुस्त्या चितपट करणार्या सत्यजित चव्हाणला ‘आखाडा किंग’ म्हणून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच महिलांच्या कुस्त्या झाल्या.
सकाळी 9 वाजल्यापासून स्थानिक कुस्तीगीरांमध्ये कुस्ती होऊन कुस्त्यांना प्रारंभ झाला. कर्जत तालुका कुस्तीगीरी अध्यक्ष श्री भगवान धुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र चंदन, प्रकाश आणेकर, मनोज वरसोलीकर, सचिन दगडे, वसंत पवार, शिवाजी लोभी, संदेश पवार, जय रुठे आदी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात 37 कुस्त्या झाल्या, तर दुपारच्या सत्रात 31 कुस्त्या झाल्या. दोन्ही सत्रात पंच म्हणून दत्तात्रेय पालांडे, मारुती ठाकरे, दीपक भुसारी, रमेश लोभी आणि दत्तात्रय म्हसे यांनी काम पाहिले. शेवटची महत्त्वपूर्ण कुस्ती गेल्या वर्षी अजिंक्य ठरलेल्या रसायनीच्या विशाल कोकरे आणि दिल्लीच्या मनजीत यांच्यामध्ये रंगली. अचानक मनजीत आखाडा सोडून निघून गेला आणि पंचांनी विशालला विजयी घोषित केले. ही कुस्ती रोख 12 हजार रुपयांची होती. दिनेश बागवे आणि दिलीप ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, वनिता म्हसे, नगरसेवक नितीन सावंत, स्मिता म्हामुणकर, पंकज बडेकर, चेतन दळवी, अभिजित मुधोळकर, नितीन गुप्ता यांनी विजेत्यांना पारितोषिके देण्यासाठी विशेष सहकार्य केले. या वेळी दिल्ली, हरियाणा, मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, नाशिक आदी भागांतून आलेले पहेलवान या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेले असंख्य कुस्तीप्रेमी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.