Breaking News

पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलिंग अभियान; सिस्केप व युथ हॉस्टेलचा उपक्रम; 25 विद्यार्थ्यांचा सहभाग

अलिबाग : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धन आणि संशोधन तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बुधवारी (दि. 19)  शिवजयंतीचे औचित्य साधून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून सायकल अभियानाला सुरुवात झाली. महाडच्या हुतात्मा स्मारकात 21 फेब्रुवारीला या अभियानाची सांगता होणार आहे.

युथ हॉस्टेल व सिस्केप संस्थेने समृध्द पर्यावरणासाठी तीन दिवस सायकल अभियानाचे आयोजन केले आहे. या प्रवासात रायगड जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी शालेय विद्यार्थ्याना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अलिबाग ते बाणकोट या समृध्द समुद्र किनार्‍यावरील कांदळवन, मुरुडचे फणसाड अभयारण्य, निसर्ग विज्ञानविषयी माहिती मुलांना शालेय जीवनात मिळणे महत्त्वाचे आहे. याचाच विचार करून सिस्केप

संस्था आणि युथ हॉस्टेलचे अलिबाग व महाड  युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल अभियानाचे आयोजन केले आहे.

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथून आमदार महेंद्र दळवी व सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते युथ होस्टेलचा स्वागत ध्वज दाखवून या अभियानाची सुरुवात झाली. यावेळी सिस्केपचे प्रेमसागर मेस्त्री हजर होते. 25 विद्यार्थी या सायकल रॅलीत सहभागी झाले आहेत.

सायकल अभियानातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय कोकणातील जैवविविधतेचा अभ्यास आम्ही करणार आहोत.

-सानिका साळवी, सहभागी विद्यार्थिनी

अशी असेल रॅली

19 फेब्रुवारी रोजी ही सायकल मोहीम सायंकाळी 6 वाजता मुरूड येथे पोहोचेल. त्यानंतर दरबार हॉल येथे सायंकाळी 7.30 वाजता पर्यावरणप्रेमींसाठी विनामूल्य पर्यावरणविषयक स्लाईड शोचे आयोजन करण्यात आले आहे. 

20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता पद्मदूर्ग दर्शननंतर राजपूरी किनारा स्वच्छता मोहिम करण्यात येईल. त्यानंतर आगरदांडा मार्गे कोळंबी प्रकल्प व कांदळवनाची माहिती घेत मांदाड खाडीच्या मुखाशी असलेल्या कुडा मांदाड लेणीचे दर्शन घेतील. तळा येथील ग्रामस्थांकड़ून अभियानाचे स्वागत होईल. त्याठिकाणी तळागडाचा  इतिहास व त्यासंबंधीचे शिल्पांची माहिती घेऊन इंदापूर येथे शिल्पकार राजेश कुलकर्णी यांच्या आकार कँम्प साईटवरवस्ती होईल.

21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ गांगवली येथून किल्ले रायगडकडे  विद्यार्थी प्रस्थान करतील. पाचाड येथील जिजामाता समाधी येथे सरपंच संयोगिता गायकवाड यांच्याकडून सायकल अभियानाचे स्वागत होईल. यावेळी रघुवीर देशमुख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. कोंझर मार्गे सायकलस्वार महाड येथील हुतात्मा स्मारकात पोचतील. तेथे सायकल अभियानाची सांगता होईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply