उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील पूर्व विभागातील प्रसिद्ध पुनाडे धरण येथे सध्या कचरा, दारूच्या बाटल्या, काच तुकडे यांचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात कचरा झाल्याने हा परिसर विद्रुप दिसत होता. हा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, कोप्रोली यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 27) पुनाडे धरण परिसरात साफसफाई करण्यात आली.
विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीच्या माध्यमातून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उरणमधील विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधिनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या वेळी काच, प्लास्टिक बाटल्या, दारूच्या बाटल्या गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छतेविषयक जनजागृती कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार, संपर्क प्रमुख ओमकार म्हात्रे, सल्लागार अॅड. गुरुनाथ भगत, जिव्हाळा फाऊंडेशन अध्यक्ष रुपेश पाटील, पंकज ठाकूर, गोवठणे विकास मंचचे सुनील वर्तक, पुनाडे ग्रामपंचायतचे सरपंच हरेश्वर ठाकूर, हेमंत ठाकूर, गोल्डन ज्यूबली मित्र मंडळचे माजी अध्यक्ष दिनेश म्हात्रे, प्रेम म्हात्रे, कुमार ठाकूर, हेमंत म्हात्रे, पंकज शर्मा तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.