आमदार प्रशांत ठाकूर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथे सेक्टर 11 मधील भूखंड क्र. 6 या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृह उभारणीसाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे. या वेळी आमदार महेश बालदी, पनवेल महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीत शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सभागृह उभारण्यासाठी कळंबोली से. 11 भूखंड के. 6सी/1 सामाजिक आरक्षित या भूखंडाची मागणी सिडको प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. कळंबोली येथील सेक्टर 11मधील भूखंड के 6सी/1 (कम्युनिटी सेंटर) क्षेत्र 1499.96 चौमी या जागेत महासभा ठराव क्र. 281 दि. 20 फेबु्रवारी 2021ला अनुसरून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासंदर्भात नकाशे, आराखडा तयार करण्यात आलेला असून अंदाजित आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या जागेवर तळ आणि दोन मजली इमारत प्रस्तावित करण्यात आलेली असून प्रस्तावित इमारतीमध्ये तळमजल्यावर पार्किंग, पहिल्या मजल्यावर बहुउद्देशीय हॉल (3772 चौ. फुट) असा संकल्पीय आराखडा तयार करण्यात आला आहे. सभागृह, कार्यालय, स्वच्छतागृह इत्यादी व दुसर्या मजल्यावर अभ्यासिका (2000 चौ. फुट) व वाचनालय (1771 चौ. फुट) याची तरतूद करण्यात आली असून या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ 1725.42 चौमी (18565.52 चौ. फुट) असे आहे. या अनुषंगाने आपल्या माध्यमातून पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर 11मधील भूखंड क्र. 6 या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृह उभारणीसाठी अंदाजित आठ कोटी रुपये निधी उपलब्ध व्हावा, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीत नमूद केले आहे.