आमदार प्रशांत ठाकूर यांचे खोपोलीच्या मुख्याधिकार्यांना पत्र
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
खोपोली नगर परिषदेत सलग तीन वेळा निवडून येत सखाराम गेणू जाधव यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे केली आहेत. सुभाषनगर तसेच खोपोलीच्या जडणघडणीत जाधव मामांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे नाव द्या तसेच परिसर सुशोभीकरण करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीचा तातडीने विचार व्हावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांचे पत्र शुक्रवारी (दि. 5) नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अनुप दुरे यांना देण्यात आले.
खोपोली भाजपच्या वतीने युवा नेते व सुभाषनगरचे प्रमुख ग्रामस्थ राहुल जाधव, महिला मोर्चा शहर अध्यक्षा शोभाताई काटे, चिटणीस गोपाळ बावस्कर, वैद्यकीय सेलचे सहसंयोजक विकास खुरपुढे, सागर काटे यांनी हे पत्र नगरपालिकेचे प्रशासक अनुप दुरे यांना दिले. या वेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील रेल्वे गेट-मस्को गेट ते सुभाषनगर या रस्त्याला स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग व त्यांच्या घरासमोरील चौकाला जाधव मामा चौक असे नाव द्यावे, अशी मागणी सुभाषनगरमधील नागरिक गेले अनेक वर्षे नगर परिषदेकडे करीत आहेत.
10 फेब्रुवारी रोजी आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांची भेट घेऊन या मागणीचे समर्थन करीत तसे पत्र दिले होते. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांना पत्र दिले आहे.