Breaking News

नवा भिडू, नवे राज्य!

गेले जवळपास चाळीसएक दिवस महाराष्ट्रात सुरू असलेले सत्तांतराचे नाट्य अखेरीस मंगळवारी कळसास पोहचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्रिय योगदान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या सरकारला असलेले पाठबळ या दोन्ही जमेच्या बाजू असल्याने येणारी आव्हाने शिंदे-फडणवीस सरकार लीलया पेलेल याबद्दल मुळीच शंका नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन महिना लोटला तरी मंत्रिमंडळाचा पत्ता नव्हता. साहजिकच विरोधकांच्या टीकेला धार चढू लागली होती. ती टीका अनाठायी होती असे नव्हे, विरोधकांचे ते कामच असते, परंतु हेच विरोधक अडीच वर्षांपूर्वी तीन-तीन पक्षांचे कडबोळे बांधून सत्तेवर आले होते, तेव्हा पहिले तेहेतीस-चौतीस दिवस त्यांनीही कारभार पाच-सहा सहकार्‍यांच्या साथीनेच पाहिला होता. त्यानंतरच मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला होता, हे विसरून चालणार नाही. जनादेशाचा योग्य तो आदर राखत अडीच वर्षे उशीरा का होईना, पण शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे. ते ज्या राजकीय परिस्थितीत आले, त्यातच मंत्रिमंडळाच्या विस्ताराची बीजे असू शकतील. ‘झाले गेले, गंगेला मिळाले’ असे म्हणून आता नव्या दमाने, नव्या उमेदीने जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला भिडावे, एवढी अपेक्षा व्यक्त करून शिंदे-फडणवीस सरकारला शुभेच्छा द्यायला हव्यात. कारण पावसाने महाराष्ट्रात थैमान घातले असून कित्येक शेतकर्‍यांचे हातचे पीक नष्ट झाले आहे. त्यांना आधार मिळायलाच हवा, तसेच कोरोनाचा भस्मासूरदेखील पुरता नष्ट झालेला नाही. गेले काही दिवस राजकारणात गेले, पण आता लोककारणासाठी नव्या सरकारने कंबर कसून कामाला लागण्याची आवश्यकता आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईतील राजभवनातील सुसज्ज अशा नव्या दरबार हॉलमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला, तेव्हा भाजपच्या नऊ आणि शिवसेनेच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ माननीय राज्यपालांकरवी घेतली. शिंदे यांच्या समर्थकांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच असल्याच्या वावड्या समाज माध्यमांमधून पेरल्या जात होत्या हे खरे, पण आम्ही कोणीही नाराज नसल्याचा निर्वाळा शिंदेसमर्थक आमदारांनीच उघडपणे दिल्याने या वावड्यांमधली हवाच निघून गेली. सध्या आकारास आलेले मंत्रिमंडळ छोटेखानीच आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर त्याचा विस्तार योग्य पद्धतीने करता येईल. सरकार पक्षात सारे काही आलबेल असताना विरोधी पक्षांची तीन तोंडे तीन दिशांना आहेत, हा एक राजकीय विनोदच म्हणावा लागेल. या लोकांना विरोध देखील धड एकजुटीने करता येत नाही, याला काय म्हणावे? मंगळवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याला विरोधीपक्ष नेते अजित पवार वगळता विरोधी पक्षाचा अन्य कोणीही नेता फिरकला नाही. सत्ता गेल्यानंतर या तिन्ही पक्षांची उमेदच हरवल्यासारखी झाली आहे. काँग्रेसची अवस्था तर केविलवाणी असून उध्दव ठाकरे यांचा उरलासुरला गटही आपली ताकद दिवसेंदिवस गमावतो आहे. राष्ट्रवादीचे नेते मात्र शांतपणे राजकीय घडामोडींकडे पाहताना दिसतात. उद्धव ठाकरे गटातर्फे अपेक्षेप्रमाणे या सोहळ्याला उद्देशून काही टोमण्यांचे बाण मारण्यात आले. ‘विस्तार केला तरी काय मोठे दिवे हे सरकार लावणार आहे?’ असा तिरकस सवाल ठाकरे यांनी केला होता, तर हे सरकार कोसळणार असे भाकित त्यांचे सुपुत्र करीत आहेत. त्याचे उत्तर शिंदे-फडणवीस सरकार आपल्या धडाकेबाज कार्यशैलीतूनच देईल असे दिसते.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply