पनवेल : वार्ताहर
पनवेल येथील शिव शंभो नाक्याजवळील सिग्नलच्या पोलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे तो पोल अत्यंत धोकादायक झाला होता. तो पोल कधीही वाहनांवर पडून मोठे नुकसान झाले असते, तसेच मोठी जीवित हानीदेखील झाली असती, परंतु ही बाब माजी नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी तत्परतेने पुढील यंत्रणा राबवून वाकलेला पोल सरळ करून दिला आहे. या घटनेच्या वेळी त्या ठिकाणी सेवेवर कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे हवालदार म्हात्रे यांनी लगेच राजू सोनी यांना कळवले.त्यांनी लगेच त्यांचे स्विय सहायक मंदार देसाई यांना त्या ठिकाणी पाठवून आवश्यक ती यंत्रणा बोलाविण्यास सांगितले. त्यानुसार ताबडतोब अग्निशामक दलाचे प्रमुख अनिल जाधव यांना फोन करून अग्निशामक दलाला तेथे बोलवले. तसेच त्या ठिकाणी असलेले वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी गणेश खांडेकर व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार कदम व कोकाटे मॅडम यांच्या मदतीने तेथे क्रेन बोलवून त्या वाकलेल्या पोलला सरळ करून घेण्यात आले. राजू सोनी यांच्या स्व खर्चाने व त्यांची स्वतःची माणसे लावून त्या पोलच्या बाजूस फाऊंडेशन टाकून पोल सुरक्षित करून दिला त्यामुळे सिग्नल यंत्रणा चालू करण्यात आली. याबद्दल तेथे असलेले वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी नगरसेवक राजू सोनी व मंदार देसाई यांचे आभार मानले.