माणगाव : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिक्षण मंडळ-कल्याण या संस्थेच्या रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिर विद्यालयात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम गीताचे गायन करून दीपोत्सवाच्या प्रकाशात शारदा स्तवन गायले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माणगाव तालुक्यातील रातवड विद्यालयात अमृत महोत्सवी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत 1ऑगस्टपासून विद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध, चित्रकला, घोषवाक्य आदी स्पर्धा, पथनाट्य, वैयक्तिक गीत गायन, दीपोत्सव, पारंपारिक वेशभूषा इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेल्या दीपोत्सवासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने घरून एक दिवा आणला होता. विद्यालयाच्या सभागृहात भारताचे मानचित्र रेखाटून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक अशी पणत्यांची सजावट केली. फुले पाने व विविध नैसर्गिक वस्तूंचा वापर करून मानचित्र सजविले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम गीत आणि शारदा स्तवन सादर केले. या दीपोत्सवानिमित्ताने विद्यालयात पारंपारिक वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे आणि घोषवाक्यांचे प्रदर्शन विद्यालयाच्या सभागृहात मांडण्यात आले आहे. मुख्याध्यापक महादेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख मनोहर पुरी, अजित शेडगे, अमोल तोडकर यांच्या संकल्पनेतून रातवड विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून त्यात विद्यालयातील 230 विद्यार्थी व 11 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper