टोकियो : वृत्तसंस्था
येथे होणार्या 2020 ऑलिम्पिकसाठी तिकीट विक्री गुरुवारी सुरू झाली असून उद्घाटन सोहळ्याचे सर्वात महागडे तिकीट तीन लाख येनचे (जवळपास एक लाख 91 हजार रुपये) असेल. जपानच्या स्थानिक नागरिकांना लॉटरी पद्धतीने तिकिटे उपलब्ध करून दिली जातील. ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या 33 खेळांसाठी वेगवेगळ्या किमतीची तिकिटे राहतील. सर्वात कमी किमतीचे तिकीट 2500 येनचे (1600 रुपये) आहे.
पुरुष 100 मीटर शर्यतीसाठी जवळपास 83 हजार डॉलर किमतीचे तिकीट उपलब्ध असेल. या तिकिटांमुळे स्पर्धा अगदी जवळून पाहण्याची संधी मिळेल. उपलब्ध तिकिटांपैकी अर्धी तिकिटे जवळपास पाच हजार रुपये किमतीची आहेत. लहान मुलांचे पालक, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी 1287 रुपये किमतीच्या तिकिटांची व्यवस्था आहे. स्थानिक नागरिकांसाठी तिकिटांची किंमत 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमधील किमतीइतकीच, तर रिओ ऑलिम्पिकच्या तुलनेत थोडी महागडी असल्याची माहिती टोकियो ऑलिम्पिकच्या विपणन व्यवस्थापकाने दिली.