देशभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह आहे. यंदा 75वा स्वातंत्र्य दिन असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा अभियान राबविल्याने भारताचा राष्ट्रीय ध्वज सर्वत्र डौलाने फडकला आणि हा एक देशभक्तीचा सोहळा बनल्याचे सुखद चित्र पहावयास मिळाले.
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. देशाला ब्र्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक महापुरुषांनी बहूमोल योगदान दिले. यामध्ये कित्येकांना वीरमरणही आले. आज या सर्वांचे स्मरण करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत देशाने केलेली वाटचाल थक्क करणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बदललेला नवा भारत तर प्रत्येक देशवासीयाची मान गर्वाने उंचावणारा आहे. विशेष म्हणजे विविध जाती-धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. सण-उत्सव एकोप्याने साजरे करतात. ही विविधतेतील एकता म्हणजे जगाच्या पाठीवरील अनोखे वैशिष्ट्य असून आजही त्याचे अनेक देशांना नवल वाटते. ऐतिहासिक पार्श्वभूमी, नैसर्गिक संपदा, भौगोलिक विविधता असे बरेच काही असूनही जागतिक पातळीवर मात्र आपल्या देशाला तितकेसे महत्त्व मिळत नव्हते किंबहुना आपल्या देशाला कमी लेखले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सक्षम व कणखर नेतृत्व लाभल्यानंतर चित्र बदलले. त्यानंतर जे काही घडले ते सर्वांनी पाहिले, अनुभवले आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा डंका वाजत आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीयांनी केलेली प्रगती अभिमानास्पद आहे. अर्थात, अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव पंतप्रधानांना आहे. विशाल दृष्टिकोन ठेवून ते व त्यांचे सहकारी कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीने मोठ मोठे देश कोसळले. महासत्ता म्हटल्या जाणार्या राष्ट्रांमध्ये अक्षरशः आणीबाणीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारतालाही या वैश्विक महामारीची झळ बसली, परंतु पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे ही स्थिती हाताळली आणि देशवासीयांना तसेच इतर देशांच्या नागरिकांनादेखील लस उपलब्ध करून दिली त्याची जगभरातून वाखाणणी झाली. आज आपला देश एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचला असून आगामी काळात एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे. त्यामुळे काही देशविघातक शक्ती, समाजकंटक अधूनमधून विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना भारताचे हित, विकास, प्रगती पाहवत नसल्याने ते अराजकता माजविण्याचा कट आखत असतात, पण देशाचे रक्षण करणारे वीर जवान, पोलीस यंत्रणा, दक्ष नागरिक असे डाव हाणून पाडतात. ज्या ज्या वेळी देशावर एखादे संकट, आपत्ती आली आहे त्या त्या वेळी देशवासीयांनी त्याचा धीराने सामना केल्याचा इतिहास आहे. तिरंगी ध्वजाची आण, बान व शान जपण्यासाठी देशप्रेमी नागरिक कधीही मागे हटणार नाही. हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने जाज्वल्य देशभक्तीचे व एकजुटीचे दर्शन घडले आहे. घरोघरी, शासकीय-निमशासकीय कार्यालये, दुकाने, विविध वास्तूंवर तिरंगा फडकला आणि त्या त्या ठिकाणच्या लोकांनी त्याला सलामी दिली. असा सोहळा अनुभवयाला मिळणे हेही भाग्यच म्हटले पाहिजे. भारताचा कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून प्रत्येकाने देशाप्रति आपले योगदान द्यायला हवे. मग भारताची भरारी कुणीही रोखू शकत नाही. सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!