शहिदांना वाहिली आदरांजली
कर्जत : प्रतिनिधी
मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ कर्जतमध्ये गुरुवारी (दि. 26) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 70जणांनी रक्तदान करून शहिदांना आदरांजली वाहिली.
कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पोलीस ठाण्याच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अरुण भोर, उपनिरीक्षक राजू अल्हाट, सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हंगामी अध्यक्ष संदीप भोईर, अभिजीत मराठे, मीना प्रभावळकर आदी यावेळी उपस्थित होते. माजी नगरसेवक निलेश हरिश्चंद्रे यांनी सर्वप्रथम रक्तदान केले. शिबिरात नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका मधुरा चंदन, माजी नगरसेवक संतोष पाटील, भालचंद्र जोशी यांच्यासह 70 जणांनी रक्तदान केले. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी आपल्या 63व्या वर्षी 64वे रक्तदान करून शहिदांना आदरांजली वाहिली.
कल्याण येथील संकल्प ब्लड बँकेचे डॉ. राजशेखरन नायर, डॉ. सोनाली देसाई, श्वेता खान, नम्रता बामुगडे, तेजश्री जाधव, प्रकाश लस्परे, नीरज नवले, सूरज नवले आदींनी रक्त संकलाचे काम केले, त्यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सदानंद जोशी, अभिजीत मराठे, निलेश परदेशी, कल्पेश शहा, मिलिंद खंडागळे यांनी मोलाचे सहकार्य केले.