अलिबाग : प्रतिनिधी
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्ताने अलिबाग तालुका व शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) पक्षाच्या अलिबाग कार्यालयासमोर एक लाख 51 हजार रुपये रक्कमेच्या बक्षिसाची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. भाजपचे दक्षिण रायगड (प्रभारी) जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या आयोजनाबद्दल माहिती देताना अलिबाग शहर अध्यक्ष अॅड. अंकीत बंगेरा यांनी सांगितले की, ही दहीहंडी अलिबाग तालुक्यासाठी मर्यादित असून अंतिम यशस्वी पथकास एक लाख 51 हजार आणि भव्य भाजप चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाच थर लावणार्या पुरुष पथकास आणि चार थर लावणार्या महिलांच्या पथकास आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा नसून आपल्या सर्वांचा उत्सव असल्याचे सांगत अलिबाग तालुका भाजपचे अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांनी तालुक्यातील सर्व पथकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. दहीहंडी फोडीचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी 4.00 वाजता सुरु होणार आहे. याची जय्यत तयारी अलिबाग तालुका भाजपच्या वतीने केली जात आहे.