Breaking News

गोऽऽविंदा रे गोऽऽपाळा!

दहीहंडीचा उत्सव सर्वत्र दणक्यात साजरा

अलिबाग, पनवेल ः प्रतिनिधी

ढाक्कुमाकूम… ढाक्कुमाकूम…, बोल बजरंग बली की जय…, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा…. गोऽऽविंदा रे गोऽऽपाळाच्या तालावर फेर धरून नाचणारे गोविंदा आणि बाळगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत संचारलेला उत्साह अशा आनंदी वातावरणात व हर्षोल्हासात शुक्रवारी (दि. 19) दहीहंडीचा उत्सव रायगड जिल्ह्यात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे सण-समारंभ हे नियमात राहून आणि निर्बंध पाळून साजरे झाले. उत्साहाचे उसने अवसान आणून सण साजरे करावे लागले. त्यातही कोरोनाच्या संसर्गाची भीती होतीच, परंतु लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोरोनाच्या  प्रादुर्भावाचा धोका कमी झाला आणि यंदा सर्वच सण-उत्सव निर्बंधमुक्त झाले. त्यामुळे यंदाचा दहीहंडीचा सण अधिकच लक्षवेधी व आकर्षित करणारा ठरला. रायगडात घरोघरी तसेच मंदिरांमध्ये गुरुवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. यानिमित्त मंदिरात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम झाले, तर घरगुती सोहळ्यातदेखील पोथीवाचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री 12 वाजता जन्माष्टमीचा सोहळा श्रद्धेने झाला. गूळ, पोहे, सुंठवडा प्रसाद म्हणून वाटण्यात आला. शुक्रवारी सकाळी बाळगोपाळांसह हौशी लोक दहीहंडीसाठी घराबाहेर पडले. डोक्याला गोविंदाची पट्टी, टी-शर्ट अशा विशिष्ट पेहरावात  फिरणारे गोविंदा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नाक्या-नाक्यावर, गल्लीबोळात सर्वत्र आज गोविंदा पथकाचे राज्य होते. मोजकी दुकाने वगळता बाजारपेठा बंद होत्या. ग्रामीण भागात सकाळपासून दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. मानाच्या, नवसाच्या आणि प्रायोजित अशा एकूण आठ हजार 167 दहीहंडी रायगडात बांधण्यात आल्या होत्या. त्या विविध पथकांनी दिवसभरात फोडल्या.

‘लाख’मोलाच्या दहीहंडी ठरल्या लक्षवेधी

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा होत असल्याने गोविंदा पथकांसाठी खर्‍या अर्थाने पर्वणी होती. उंचच्या उंच मानवी मनोरे रचून सर्वाधिक उंचीची दहीहंडी फोडण्यासाठी सर्वच गोविंदा पथकांनी मागील एक-दोन महिने सराव केला होता. त्या सरावाची शुक्रवारी कसोटी होती. भाजपच्या वतीने उलवे नोडमध्ये एकूण तीन लाख 55 हजार 555 रुपयांची पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी असलेली दहीहंडी बांधली होती. या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय इतरही लहान-मोठ्या दहीहंड्या आकर्षण होत्या.

मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी रंगत

दहीहंडीच्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनोरंजनात्मक गीत-नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे गोविंदांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले. या वेळी ‘मच गया शोर सारी नगरी रे’, ‘बोल बजरंग बली की जय’, ‘तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा’, ‘आला रे आला गोविंदा आला’, ‘शोर मच गया शोर, देखो आया माखन चोर’, ‘गोविंदा, गोविंदा तीनपट्टी वाला’ यांसारख्या जुन्या तसेच नव्या गोविंदा गीतांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. दोन वर्षांची कसर शुक्रवारी सर्वांनीच भरून काढली.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply