Breaking News

नवी मुंबई मनपा मेडिकल कॉलेजसाठी गतिमान

आरोग्य सेवेला मिळणार बळकटी; कामांना आला वेग

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महापालिकेतर्फे प्रथमच स्वतःच्या मालकीचे पदव्युत्तर पदवी मेडिकल कॉलेज सुरू केले जाणार आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मे 2023पर्यंत मुदत प्रशासनाला दिली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे येत्या तीन वर्षांत महापालिकेच्या वाशी आणि तेरणा या दोन रुग्णालयांना तब्बल 200 डॉक्टरांचे कायमस्वरूपी बळ मिळणार आहे.

आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने स्वत:चे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी नवी मुंबई महापालिका गतिमान झाली आहे. यासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेणे तसेच मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक पात्रतेची मनुष्यबळ उपलब्धता करणे व साधनसामुग्री व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे, तसेच पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे.

मे 2023च्या शैक्षणिक सत्रात मेडीकल कॉलेज सुरू करून पहिल्या टप्प्यात मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपॅडिक, गायनॅकोलॉजी आणि पिडियाट्रिक अशा पाच शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने पालिकेने प्रयत्न करीत आहे. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फतही प्रमाणपत्र आले आहे, तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.

आता महापालिकेला नॅशनल मेडिकल कमिशनतर्फे होणार्‍या प्रत्यक्ष तपासणीला सामोरे जायचे आहे. या अनुषंगाने आवश्यक सर्व बाबींची पूर्तता काटेकोरपणे व गतिमानतेने करण्याचे, निर्देश अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पीजी मेडिकल कॉलेजच्या पाच शाखा सार्वजनिक रुग्णालय वाशी व माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय नेरूळ येथे सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

दर 15 दिवसांनी घेणार आढावा

या वैद्यकीय कॉलेजसाठीच्या विविध प्रकारच्या समित्या, कागदपत्रे, अर्जांची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापित करण्यात आली आहे. ही समिती कॉलेजसंबंधित नियमित बैठका घेऊन या कार्यवाहीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची दक्षता घेत आहे, तसेच आयुक्तांकडूनही दर पंधरवड्याला झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार आहे.

या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी होईल. यामुळे महापालिका रुग्णालयात सर्जिकल इन्टेसिव्ह केअर, मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडियाट्रिक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी अ‍ॅण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा प्रकारच्या सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply