Breaking News

बाळगंगा नदी प्रदूषणप्रकरणी उत्तम स्टीलला बंदची नोटीस

कामगारांच्या नोकरीवर गदा; तीव्र संताप

खोपोली : प्रतिनिधी

जलप्रदूषण केल्याप्रकरणी खालापूर तालुक्यातील उत्तम स्टील कारखाना व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण  मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली नोटीस दिली आहे. त्यामुळे या कारखान्यातील कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे नोकरी धोक्यात आल्याने कामगार वर्गातून व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यामधील तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतील उत्तम स्टील कारखान्यातील केमिकलयुक्त  लालसर पाणी जावून 18 ऑगस्टला बाळगंगा नदी प्रदुषीत झाली. या नदीच्या पाण्यावर तांबाटी, नारंगी, नंदनपाडा, जांभिवली, गोरठण, होराळे, शिरवली याच्यासह 15 हुन अधिक ग्रामपंचयतीच्या पाणी योजना अवलंबून आहेत. नदीच्या दूषित पाण्यामुळे सुमारे 50 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने तांबाटीचे सरपंच अनिल जाधव, जांभिवली ग्रामपंचयतीचे सरपंच दिनेश घाडगे, तसेच नितीन कदम, राकेश लाड, महेश सोगे, आशिष कोंडे, अविनाश कदम मोहन घाडगे, सुधीर दळवी, संतोष पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले. दरम्यान, खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशावरून तलाठी माधव कावरखे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामे केले. पाण्याचे नमुने घेऊन ते प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांना सादर केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे  फिल्ड ऑफिसर अरविंद धपाटे यांनी घटनास्थळी भेट देवून जल प्रदुषणाची खातरजमा केली. त्यानंतर किल्लेदार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून उत्तम स्टीलच्या व्यवस्थापनाला कारखाना बंद करण्याचे आदेश पाठविले आहेत. त्यामुळे नोकरीवर गदा येण्याच्या भीतीने या कारखान्यातील कामगार धास्तावले आहेत.

उत्तम स्टील या कारखान्याने 18 ऑगस्टला नाल्यावाटे काळ नदीत प्रदूषित पाणी सोडल्याचे निदर्शनास आले आहे. याच संदर्भात या आधीही कारखाना व्यवस्थापनाला अनेकवेळा नोटीस बजावण्यात आल्या होत्या, मात्र त्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. ही कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आल्याने कारखाना बंदची नोटीस बजावण्यात आली आहे.

-व्ही. व्ही. किल्लेदार, प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, रायगड

उत्तम स्टील व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनी बंद करण्याची नोटीस दिल्याने कारखान्यातील सुमारे दोन हजार कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे, याचबरोबर परिसरातील ट्रान्सपोर्ट, हॉटेल, दुकाने, व इतर अनेक छोटे मोठे व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांवर आर्थिक संकट कोसळणार असल्याने शासनाने कंपनी बंदचा पुनर्विचार करावा.

-अनिल कर्णूक, कामगार नेते, उत्तम स्टील

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply