अलिबाग : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. रायगड जिल्ह्यातील 11 लाख 9 हजार 250 मतदार या मतदारसंघात आहेत. हेच मतदार मावळचा खासदार ठरवणार आहेत. या मतदारसंघात 21 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थपवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या सहा विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघात 22 लाख 27 हजार 733मतदार आहेत. पनवेल, उरण, कर्जत या रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील 11 लाख 9 हजार 250 मतदारांचा यात समावेश आहे. यामध्ये पुरुष 5 लाख 77 हजार 180आणि महिला 5 लाख 32 हजार 67 आणि तृतीयपंथी तीन मतदारांचा समावेश आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 5 लाख 39 हजार 187, उरण 2 लाख 90 हजार 273, कर्जत 2 लाख 79 हजार 790 मतदार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात यावर निकाल अवलंबून राहणार आहे.
रायगड जिल्ह्यातील एकूण 1 हजार 266 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रीया होणार आहे. यात पनवेल 584, उरण 339, कर्जत 343 मतदान केंद्रांचा समावेश आहे. पनवेल, कर्जत आणि उरण मतदारसंघातील मतदान केंद्रांवर 1 मतदान केंद्राध्यक्ष, 1 प्रथम मतदान अधिकारी, 2 इतर मतदान अधिकारी असे एकूण 4 मतदान अधिकारी असतील. सर्व मतदान केंद्रांसाठी 10 टक्के राखीव मतदान अधिकारी मिळून एकूण 5592 मतदान अधिकारी कर्मचारी असतील. तीन मतदारसंघात मतदानासाठी 2 हजार 916 बॅलेट युनिट्स, 1 हजार 454 कंट्रोल युनिट्स आणि 1 हजार 538 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध झाली आहेत. ही मतदान यंत्रे ने-आण करणार्या वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जीपीएस माँनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला आहे. मतदारसंघातील 132 ठिकाणी मतदानाचे वेब कास्टींग केल जाणार आहे.
पाच मतदान केंद्रे संवेदनशील
पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील पाचही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर पनवेल मधील 10 मतदान केंद्र व उरणमधील 3 मतदान केंद्र ही क्रिटीकल पोलींग स्टेशन म्हणून निश्चित करण्यात आलेले आहेत. पनवेलच्या 10 मतदान केंद्रांपैकी 7 खारघर मधील आहेत. याठिकाणी जास्तीचा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.