श्रेयवादावरून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी घेतला समाचार
माणगाव : प्रतिनिधी
महाड विधानसभा मतदारसंघात येणार्या माणगाव तालुक्यामधील अनेक गावांच्या पाणी योजना आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केल्या आहेत. या कामांचे श्रेय अन्य कुणी घेऊ नये. राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षांनी आपली पात्रता बघून टीका करावी. त्यांनी आमच्या आमदारांवर पुन्हा टीका केल्यास समाचार घेऊ, असा इशारा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी मंगळवारी (दि. 23) कशेणे येथे पत्रकार परिषदेत दिला.
माणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर करून आणल्याचे आमदार भरत गोगावले यांनी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या निजामपूर विभागीय अध्यक्षांनी या पाण्याच्या योजना माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून झाल्याचे सोशल मीडियावरून म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा घोसाळकर यांनी खरपूस समाचार घेतला. या पत्रकार परिषदेला तळा तालुका प्रमुख प्रधुम्न ठसाळ, दाखणे ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वास उभारे, विभागप्रमुख विलास शिंदे, अजित भोनकर आदी उपस्थित होते.
महाड मतदारसंघातील एकट्या दाखणे (ता. माणगाव) ग्रामपंचायत हद्दीत आमदार गोगावलेंच्या माध्यमातून 12 कोटींची विकासकामे झाली आहेत. आमदार गोगावले नेहमी म्हणतात की, आम्ही केलेल्या कामांचे श्रेय दुसर्याने घेऊ नये. या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. त्याचे श्रेय कुणी घेऊन नये. राष्ट्रवादीच्या निजामपूर विभागीय अध्यक्षांनी आमच्या नादी लागू नये, असे घोसाळकर म्हणाले.
आमदार भरत गोगावले यांनी तीन वेळा निवडून आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. भविष्य काळामध्ये ते पालकमंत्री होणार आहेत. त्यावेळी महाड विधानसभा मतदार संघ नव्हे तर संपुर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ते फार मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करतील. त्यांच्या पाठीशी सर्व जनता ठामपणे उभी आहे, असे प्रमोद घोसाळकर म्हणाले.
जिल्हाप्रमुख घोसाळकर पुढे म्हणाले की, इंदापूर येथील मंगेशी मंगल कार्यालयात शनिवारी (दि. 27)दुपारी 12 वाजता शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. त्यावेळी खर्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार भरत गोगावले पाठीशी किती लोक आहेत, हे लक्षात येतील.