मुरूडमध्ये मागणी वाढली; कुशल कारागिरांची कमतरता
अलिबाग : प्रतिनिधी
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशमूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहेत. मुर्तीकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मुर्तीकार प्रयत्न करत आहेत. यंदा गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. त्यामुळे काम वाढले आहे. परंतु कुशल कारागीर मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत.
मुरूड तालुक्यात सुमारे 150 गणपती कारखानदार असून सर्वच कारखानदार गणपतीचे काम अंतिम टप्याकडे नेण्याचे काम सुरु आहे. पाऊस थांबल्यामुळे वीज खंडीत होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे यंदा गणेश मूर्ती रंगविण्याचे काम वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे गणपतीच्या मूर्तीला जास्त मागणी नव्हती. मात्र यंदा निर्बंध उठविल्याने मोकळ्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. मात्र कुशल कारागीरांनी गावोगावी आपले कारखाने सुरु केल्याने मुरूडमधील गणेशमुर्ती कारखानदारांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. एकीकडे गणेशोत्सावाला अवघे काही दिवस उरले आहेत तर दुसरीकडे गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. त्याचा मेळ घालताना कारखानदारांची तरांबळ उडाली आहे.