Breaking News

काँग्रेस ः बुडते जहाज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दोन दिवसांपूर्वी प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. आझाद यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून 48 तास उलटत नाही तोच गांधी घराण्याचे युवराज राहुलबाबांच्या नेतृत्वावर टीका करीत तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चाललंय काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेल्या आणि 137 वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या गलितगात्र झाली आहे. या पक्षाला विरोधी पक्ष तरी कसे म्हणावे असा प्रश्न निर्माण होतो इतकी बिकट अवस्था झाली आहे. एकेकाळी काँग्रेस म्हणजे भारत आणि भारत म्हणजे काँग्रेस असे समीकरण होते. या पक्षाने अनेक दशके देशाची अमर्याद सत्ता उपभोगली. त्या वेळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व असायचे. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा तसेच इतरही छोट्या-मोठ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून येत असत. एवढी वर्षे एवढा मोठा देश ताब्यात असूनही काँग्रेस पक्ष देशाची अपेक्षित प्रगती व विकास मात्र करू शकला नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात तर भ्रष्टाचार, अवहेलना, बेकारी, महागाई देशाच्या पदरी आली. लोक या सगळ्याला कंटाळले होते, पण वाचा फोडायला सक्षम नेतृत्व नव्हते. अखेर 2014मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, घोटाळे यावरून काँग्रेसवर प्रहार करीत देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी देशवासीयांना साद घातली आणि नागरिकांनीही त्यांना प्रतिसाद दिला. तेव्हापासून काँग्रेसच्या वाटचालीला ब्रेक लागला तो आजही कायम आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. अनेक राज्येही काँग्रेसकडून निसटली. त्याचबरोबर असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हा पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले. अशा परिस्थितीत पक्षसंघटना पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना काँग्रेस हायकमांड मात्र शांतच आहे. पक्षाला साधा पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. मध्यंतरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्याचा प्रयोग करण्यात आला, मात्र जनेतेने राहुल यांना साफ नाकारले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि पक्षाध्यक्ष पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडे आले. त्या हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत, मात्र वयोमानानुसार त्यांना मर्यादा येत आहेत. पक्षाची अवस्था पाहता पूर्ण वेळ आणि मेहनती अध्यक्ष देणे गरजेचे आहे. नेत्यांच्या ‘नाराजी’नाम्यामुळे पक्षात अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, पण गांधी घराण्याबाहेर अध्यक्षपद देणार का ही खरी गोम आहे. एकीकडे भाजप सर्वच स्तरांवर वरचढ ठरत असताना दुसरीकडे विरोधी पक्षात असलेली काँग्रेस मात्र सुस्त दिसते. वर ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करणे, पात्र लोकांना डावलणे असे प्रकार या पक्षात सुरू असल्याने वरिष्ठ नेते राजीनामा देत आहेत, काही इतर पक्षांत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसची अवस्था बुडत असलेल्या जहाजासारखी झाली आहे. परिणामी सुज्ञ मंडळी स्वत:ला वाचविण्यासाठी तिथून बाहेर पडत आहेत. आता तरी पक्षनेतृत्व काही ठोस निर्णय घेणार का यावरच या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसने वेळीच पावले उचलली नाही, तर विरोधी पक्षाचा अधिकारही ते हिरावून बसतील एवढे मात्र नक्की.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply