अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे आयोजित रायगड जिल्हा पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नवजीवन क्रीडा मंडळ पेझारी संघाने विजेतेपद पटाकावले. ज्ञानेश्वर क्रीडा मंडळ कोळवे संघ उपविजेता ठरला, तर बजरंग बेली आणि गणेश दिवलांग या संघांनी तृतीय क्रमांक मिळवला. नवजीवन पेझारी आणि ज्ञानेश्वर कोळवे यांच्यातील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मध्यंतराला नवजीवन संघाकडे 15-10 अशी आघाडी होती. उत्तरार्धात ज्ञानेश्वर कोळवे संघाने ही पिछाडी भरून काढली. कोळवे संघाकडे 22-20 अशी आघाडी होती. नवजीवनने पुन्हा आघाडी घेतली. सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना नवजीवन संघ सात गुणांनी आघाडीवर होता. राहुल कोळीने केलेल्या उत्कृष्ट खेळामुळे कोळवे संघाने ही पिछाडी भरून काढली. निर्धारित वेळाच्या खेळात सामना 30-30 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे पाच-पाच चढायांचा टायबेकार खेळविण्यात आला. यात नवजीवन संघाने 5-4 अशी बाजी मारून अजिंक्यपद मिळवले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ज्ञानेश्वर कोळवे संघाने गणेश दिवलांग संघाचा पराभव केला, तर दुसर्या उपांत्य सामन्यात नवजीवन पेझारी संघाने बजरंग बेली या संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पेझारी, भेंडखळ, मुंढाणी, सहाण येथे एकूण 64 संघांचे सामने खेळविण्यात आले. त्यातून 16 अव्वल संघ निवडून सहाण येथे ही स्पर्धा खेळविण्यात आली.