Breaking News

‘लम्पी’चा प्रादूर्भाव रोखण्याकरिता सतर्कता बाळगावी

सुधागड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कोकरे यांचे पशुपालकांना आवाहन

पाली : प्रतिनिधी

गाई, म्हशीमध्ये होणार्‍या लम्पी स्कीन या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता पशुपालकांनी काळजी घ्यावी व सतर्कता बाळगावी, असे आवाहन सुधागड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी केले आहे. जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन या रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे समजले आहे. या रोगाचा प्रादूर्भाव रायगड जिल्ह्यातील पशुधनामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लम्पी स्कीन रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारात पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, मात्र पशुपालकांनी सतर्क राहून दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. लम्पी स्कीन रोगाचा संसर्ग कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. डास चावणार्‍या माशा, गोचिड, चिलटे, बाधित जनावराचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यामुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. या रोगाने बाधित जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मिलीमीटर व्यासाच्या गाठी येऊन सुरुवातीस भरपूर ताप येतो. काही जनावरात पायावर सूज येणे, लंगडणे, डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येणे, चारा-पाणी खाणे कमी करणे अथवा बंद करणे, त्यामूळे दूध उत्पादन कमी होणे,अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न घटते.  बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत, डास, गोचिड व तत्सम किड्यांचा बंदोबस्त करावा, तसेच, निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावावे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करावी, या आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्या जनावरावर त्वरीत उपचार करून घ्यावेत. त्याचप्रमाणे पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे.

लम्पी स्कीन रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, तसेच सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथून गुरांच्या गोठ्यात कीटकनाशक फवारणीस सुरुवात करण्यात आली आहे.

– डॉ. प्रशांत कोकरे, पशुसंवर्धन अधिकारी, सुधागड

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply