खालापूर : प्रतिनिधी
एक्सप्रेस वेवरील अपघातग्रस्तांना मदत करताना जखमी झालेले खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड यांच्या मदतीसाठी दिलासा फाउंडेशने पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून फाउंडेशनने गुरुवारी (दि. 8) पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्याकडे पाच हजारांचा धनादेश सुपूर्द केला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 5 सप्टेंबर रोजी रात्री कारला अपघात झाला होता. जखमी कारचालकाला मदत करण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी राजेश्वर चव्हाण तसेच होमगार्ड लक्ष्मण आखाडे व दीपेश हातनोलकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर फोर्टिज आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खालापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी आपापल्या परीने आर्थिक मदत करीत आहेत. दिलासा खालापुरातील फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत जखमी पोलीस, होमगार्ड यांच्या मदतीसाठी पाच हजारांचा धनादेश गुरुवारी खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज कळमकर, उपाध्यक्षा भाग्यश्री शिंदे, अदिती कळमकर, दीपक जगताप उपस्थित होते.