राष्ट्रवादी, शेकापच्या पदाधिकार्यांचा समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश
पनवेल ः वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि कामोठे येथील अर्जुन डांगे यांनी रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उठाव करून भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन केले. त्यांच्यासमवेत 50 आमदार, 12 खासदार, जिल्हाप्रमुख व इतर पदाधिकार्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला. आजही मोठ्या प्रमाणात पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करीत असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांनादेखील सुरूंग लावण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जिल्हा सचिव म्हणून गेल्या चार वर्षांपासून राऊत काम करीत होते. शेकापचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि कामोठे शहर उपाध्यक्ष अर्जुन डांगे यांनीसुद्धा शिंदे गटाची कास धरली. त्यांच्यासोबत सुनील चिलप, मच्छींद्र झगडे, संतोष मंजुळे, सुभाष गोळे, महेश नायडू, ऋषिकेश शर्मा, अनिल सिंग, अमोल चिलप, नामदेव मुळीक, शंकर मुळीक, जयदीप थोरवे, साहिल चिलप, अमोल पारठे, अनिल राऊत, दत्ता वाबळे अविनाश परखांदे यांनीही पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास पक्षाचे सचिव संजय मोरे, लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अॅड. श्रीनिवास क्षीरसागर, पुण्याचे सागर सैदाने, पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख अॅड. प्रथमेश सोमण, तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे उपस्थित होते.