Breaking News

‘लम्पी’वर स्वदेशी लस तयार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. मध्यतंरी कोरोनावर मात करणार्‍या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लम्पी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते ग्रेटर नोएडा येथील वर्ल्ड डेयरी समिटच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अलीकडच्या काळात भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी नावाच्या आजारामुळे पशुधनाचे नुकसान झाले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारसह विविध राज्य सरकार प्रयत्नशील आहेत, पण आता काळजी करण्याचे कारण नसून भारतीय शास्त्रज्ञांनी या आजारासाठी स्वदेशी लसीची निर्मिती केली आहे. या वेळी त्यांनी देशातील प्राण्यांच्या सार्वत्रिक लसीकरणावरही भर देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही सांगितले. 2025पर्यंत 100 टक्के प्राण्यांना फुट एंड माउथ डिसीज आणि ब्रुसलॉसिसच्या विरोधातील लस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
2014पासून केंद्र सरकारने भारताच्या दुग्ध क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम आज दुग्धोत्पादनापासून शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 2014मध्ये भारतात 146 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले होते. आता ते 210 दशलक्ष टन झाले असून यामध्ये सुमारे 44 टक्के वाढ झाल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारत दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार करत आहे. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराचे टॅगिंग केले जात आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डेअरी क्षेत्राशी संबंधित प्राण्यांची बायोमेट्रिक ओळख केली जात असून याला पशु आधार असे नाव देण्यात आले आहे.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply