Breaking News

पेणमधील अमन स्टार बेकरी बंद; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पेण : प्रतिनिधी

शहरातील एका हॉटेलमधील पावामध्ये उंदराची विष्टा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी वि. श्री. निकम यांनी रामवाडी येथील अमन स्टार बेकरी बंद करण्याचे लेखी निर्देश देऊन बेकरी मालकाला 20 हजारांचा दंड ठोठावला. तर विशाल बेकरी मालकास नोटीस देऊन बेकरी बांधकामात आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये योग्य ते बदल करण्याचे लेखी आदेश दिले. अन्न व औषध प्रशासन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 सप्टेंबर रोजी अन्न व औषध विभागाने पेण रामवाड़ी येथील बेकर्‍यांचा पहाणी दौरा करून कारवाईला सुरवात केली. सकाळी 10 वाजता सुरु झालेली ही कारवाई तब्बल सात तास सुरु होती. या कारवाईत रामवाडी येथील अमन स्टार बेकरी यांना व्यवसाय बंद करण्याचे लेखी निर्देश देऊन 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तर विशाल बेकरीच्या मालकास नोटीस देऊन बेकरी बांधकामात आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये योग्य ते बदल करण्याचे आदेश दिले. तसेच अन्न सुरक्षा कायदा 2006 अंतर्गत स्वच्छता नियमांचे पालन करुनच व्यवसाय सुरु करता येईल, असे निर्देश या बेकरी मालकास दिले आहेत. पाव विकणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाई करुन प्रत्येकी 1500 रुपये दंड आकारण्यात आला आहे. तर संबंधित हॉटेलचे ऑडिट करुन हॉटेल मालकासही दंड भरण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन अधिकारी वि. श्री. निकम यांनी सांगितले.  या वेळी बेकरी व्यावसायिक आणि तेथे काम करणार्‍या कामगारांची कागदपत्रे, ओळखपत्रे तपासण्यात आली. तसेच बेकरी व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची तपासणी करुन तेथील पदार्थांचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले. दरम्यान, बेकरी व्यावसायीक आणि त्यांच्या कामगारांसाठी अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत लवकरच स्वच्छता कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्याचे निकम यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply