खोपोली : प्रतिनिधी
गणेशोत्सवानंतर लगेच आलेल्या अंगारक योग निमित्ताने अष्टविनायक क्षेत्र महड येथे वरदविनायकाच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 13) भक्तांनी गर्दी केली होती. पहाटे महाआरती झाल्यापासून लागलेल्या भाविकांच्या रांगा रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्या. अंगारकी चतुर्थीनिमित्त महड मंदिर सभामंडपात विविध फुले वापरून साकारलेली आकर्षक रांगोळी, फुलांची आरास व मन प्रसन्न होईल अशी सजावट करण्यात आली होती. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून श्री. क्षेत्र महड देवस्थान व्यवस्थापन कमिटीच्या कार्यवाह मोहिनी वैद्य व वरिष्ठ सदस्य केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन कमिटी कार्यमग्न होती. खालापूर पोलीस व स्थानिक नागरिकांनी सोयी-सुविधा उपलब्ध केल्याचे दिसले. मंदिर व्यवस्थापक राजेंद्र बडगुजर यांची टीम सज्ज होती. दरम्यान, खोपोलीतील शांतीनगर येथील ओझा गणपती मंदिर, काटरंग येथील सिद्धिविनायक मंदिर व खालापूर तालुक्यातील विविध गांवातील गणेश मंदिरातही अंगारकीनिमित्त भजन, आरती, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने झाले.