Breaking News

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित

राज्य सरकारचा निर्णय

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्याने 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बुधवारी (दि. 12) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या वयोगटासाठी उपलब्ध असलेल्या लसी आता 45 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना देण्यात येणार आहेत, असेही टोपे यांनी या वेळी स्पष्ट केले.
राज्यात दुसर्‍या डोससाठी नागरिकांना एकूण कोविशिल्डच्या 16 लाख, तर कोवॅक्सिनच्या चार लाख लसी बाकी आहेत. दुसर्‍या डोससाठी अशा एकूण 20 लाख लसींची सध्या गरज आहे, तर आपल्याकडे उपलब्ध लसींमध्ये कोविशिल्ड सात लाखांपर्यंत डोस, तर कोवॅक्सिनचे साधारण तीन लाखांपर्यंत डोस उपलब्ध आहेत. म्हणजेच एकूण 10 लाख डोस उपलब्ध आहेत, असे टोपे यांनी सांगितले.
सध्या 45 वर्षांच्या वरील नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसर्‍या डोससाठी वापरण्यात येणार असल्याचे टोपे यांनी जाहीर केले. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वांत आधी 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करू नये. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 20 तारखेनंतर सीरम इन्स्टिट्यूकडून लसींचे अधिक डोस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल, असे टोपे म्हणाले.
31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार
राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवले जावे, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. लॉकडाऊनबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री ठाकरे जाहीर करतील, असे या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखांच्या जवळ पोहचली होती. निर्बंध कठोर केल्यानंतर हा आकडा आता कमी होत आहे, मात्र बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या कमी होत असताना काही जिल्ह्यांत रुग्ण वाढत आहेत. त्यात म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढू लागले आहेत. त्यामुळेच राज्यात आणखी किमान 15 दिवस लॉकडाऊन वाढवला पाहिजे, असे सर्वांना वाटत असल्याचे टोपे यांनी पुढे नमूद केले. लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर नव्याने नियमावली जारी करण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच लोकल सेवेबाबत सध्या जे निर्बंध आहेत ते पुढेही कायम राहतील. त्यात काही सवलत दिली जाईल असे वाटत नाही, असे टोपे म्हणाले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply