Breaking News

वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला!

उरण : प्रतिनिधी
यंदा सुरुवातीला नाममात्र हजेरी लावून नंतर मात्र दडी मारलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून पुन्हा आपली हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून महिनाभरापासून खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे.
हवामान विभागाने जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता, मात्र हा अंदाज साफ चुकला. त्यानंतर दोन-चार दिवस पावसाच्या हलक्या सरी, तर कुठे रिमझिम पाऊस बरसला होता. त्यामुळे रायगडातील शेतकर्‍यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली होती. खुरपणी, नांगरणी करून भात बियाण्यांची पेरणी केली होती, मात्र मागील 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरण्यात आलेली भात बियाणी करपण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागले होते.
अखेर पावसाने गुरुवारपासून जोरदार हजेरी लावली. दोन दिवस पडलेल्या पावसाने शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नांगरणीच्या कामात मग्न झाले आहेत, तर अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी पावसामुळे खोळंबलेल्या शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. उशिराने का होईना पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply