पनवेल : वार्ताहर
बनावट नोटा शोधून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी एका महिलेजवळची एक लाख रुपयांची रोख रक्कम आपल्याकडे घेऊन त्यातील 38 हजार रुपयांच्या नोटा हातचलाखी करून चोरून पलायन केल्याची घटना कळंबोली सेक्टर-11मधील स्टेट बँकेत घडली. कळंबोली पोलिसांनी या भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिलेचे नाव रीता यादव (32) असे असून ती कळंबोली सेक्टर-13मध्ये कुटुंबासह राहण्यास आहे. रीता यादव हिला खासगी कामासाठी पैशांची गरज असल्याने ती आपल्या मोठ्या मुलासह कळंबोली सेक्टर-11मधील स्टेट बँकेत एक लाख रुपयांची रोख रक्कम काढण्यासाठी गेली होती. या वेळी रीता यादव हिने बँकेतून एक लाख रुपयांची रक्कम काढल्यानंतर सदर रक्कम मोजून आपल्या बॅगेत ठेवत असताना तिच्याजवळ आलेल्या दोघा भामट्यांनी बँकेकडून देण्यात आलेल्या नोटांमध्ये काही नोटा या डुप्लिकेट असल्याचे तसेच त्यातील डुप्लिकेट नोटा शोधून देण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. या वेळी रीता यादव हिने दोघा भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्याजवळच्या एक लाख रुपयांच्या नोटा भामट्यांना दिल्या. या वेळी सदर भामट्यांनी डुप्लिकेट नोटा शोधून देण्याच्या बहाण्याने एक लाख रुपयांतील 2 हजाराच्या 19 नोटा हातचलाखी करून काढून घेतल्या. त्यानंतर उर्वरित 62 हजारांच्या नोटा रीता यादव हिला परत केल्या. तसेच त्यात दोन डुप्लिकेट नोटा असल्याचे दाखवून त्या बँकेच्या कॅशिअरकडून बदलून घेण्यास सांगून त्या ठिकाणावरून पलायन केले. त्यानुसार रीता यादव बँकेच्या कॅशिअरकडे गेल्या असता कॅशिअरने सदर नोटांची तपासणी करून त्या नोटा खर्या असल्याचे सांगितले. त्यानंतर रीता यांनी आपल्याजवळच्या सर्व नोटा पुन्हा मोजल्या असता त्यातील 38 हजारांच्या नोटा दोघा भामट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.