कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील किरवली गावामधील प्रभाकर शेळके आणि त्यांच्या बंधूंनी गावातील 43 ज्येष्ठ नागरिकांना विमानातून काशीयात्रेला नेले असून, पाच दिवसांची ही संपूर्ण यात्रा मोफत आहे. किरवली येथील साईकृपा शेळके बंधू सभागृहाचे मालक प्रभाकर शेळके यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांना विमानातून काशीयात्रेला न्यायचे नियोजन केले. त्यानुसार 43 ज्येष्ठ नागरिक तयार झाले. त्यांमध्ये निम्म्या महिलाही होत्या. धोतर, लेंगा, झब्बा हा पुरुष यात्रेकरूंचा तर नऊवारी साडी हा महिला यात्रेकरूंचा पेहराव होता. या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. साईबाबा मंदिराच्या प्रांगणात एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कीर्तनकार मारुती महाराज राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाची सुरुवात करण्यात आली. अॅड. गोपाळ शेळके यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. प्रा. एल. बी. पाटील, मारुती बागडे, रमाकांत म्हात्रे, प्रा. मनीषा बैकर व लक्ष्मण अभंगे यांनी मनोगत व्यक्त केेले. हभप मारुती महाराज राणे, सुनील भिडे यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. आयोजक प्रभाकर शेळके, पोलीस पाटील विवेक बडेकर, कमल विशे, हुनेद बोहरी आदी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर हे सर्व यात्रेकरू बसने सांताक्रूझ विमातळावर आले आणि तेथून इंडिगोच्या विमानाने वाराणशी- काशीकडे रवाना झाले. या वेळी विनोद पांडे, सचिन ओसवाल, प्रभाकर बडेकर, नितीन ढाकवळ, राम बडेकर, योगेश म्हसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.