मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
पनवेल ः प्रतिनिधी
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिले जाणारे विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी गुरुवारी (दि. 31) जाहीर केले असून, यामध्ये दैनिक राम प्रहरचे उपसंपादक आणि मुद्रितशोधक सुधाकर जगताप यांना प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 21 जून रोजी संघाचा वर्धापन दिन साजरा केला जातो, मात्र कोरोनामुळे 2020मध्ये हा समारंभ होऊ शकला नाही. त्यामुळे वर्धापन दिनाचे पुरस्कार आणि पत्रकार दिनाचे पुरस्कार एकत्रितपणे 6 जानेवारी रोजी देण्यात येतील, असे मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पुरस्कारांचा तपशील (वर्धापन दिनाचे पुरस्कार)
1) युगारंभकार सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार – प्रमोद चंचूवार, राजकीय संपादक, दै. अजिंक्य भारत.
2) समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्कार – शेखर देशमुख, सल्लागार संपादक, मुक्त संवाद.
3) दिवंगत अॅड्. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा पुरस्कार – नितीन सोनावणे, मुख्य छायाचित्रकार, इकॉनॉमिक टाइम्स.
4) प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार – सुधाकर जगताप, उपसंपादक, दै. राम प्रहर.
5) शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा पद्मश्री यमुनाताई खाडिलकर पुरस्कार – विनायक डिगे, आपलं महानगर.
पत्रकार दिनाचे पुरस्कार
1) आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार – बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार ः कृष्णात पाटील, झी 24 तास.
2) जयहिंद प्रकाशन पुरस्कार – पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन करणार्या पत्रकाराचे चालू वर्षातील उत्कृष्ट पुस्तक : डॉ. नरेंद्रकुमार विसपुते, वृत्त संपादक, मुंबई दूरदर्शन (‘अनंतराव भालेराव यांचे ग्रामीण विकास पत्रकारितेतील योगदान’ या प्रबंधासाठी.)
3) कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार – कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार ः प्रशांत पवार, दिव्य मराठी.
4) विद्याधर गोखले : पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार ः नीला उपाध्ये (पुस्तकाचे नाव-मी वसंततिलका)
5) रमेश भोगटे स्मृती पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा पुरस्कार : विनोद जगदाळे, न्यूज 24.
6) ‘शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार : शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी दिला जाणारा पुरस्कार ः मेघा गवंडे, दै. सामना.
6 जानेवारी रोजी महनीय प्रवक्ते चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई 400 001 येथे सदर पुरस्कार वितरित केले जातील. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी केले आहे.