स्वेटरऐवजी छत्री घेऊन बाहेर पडण्याची वेळ
पाली ः प्रतिनिधी
अलिकडच्या काळात ऋतूचक्र बदलले आहे. कधी उन्हाळ्यात पाऊस, कधी पावसाळ्यात कडक ऊन, तर हिवाळ्यात मुसळधार पाऊस अशी परिस्थिती हवामान बदलल्याचे संकेत देत आहे. रायगड जिल्ह्यात ऐन थंडीच्या दिवसांत पावसाने हजेरी लावली असून स्वेटरऐवजी छत्री सोबत घेऊन बाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवारपासून पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणही पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि. 7) सलग दुसर्या दिवशी अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. हवामान बदलाचा सर्वांत मोठा फटका शेतकरीवर्गाला बसतोय. वादळे, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, तर कधी परतीचा पाऊस तडाखा देत असल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गळून पडत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.