पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात राहण्यासाठी चाचण्यांवर नेहमीच भर दिला असून पालिकेने आतापर्यंत 10 लाखांहून अधिक चाचण्या महापालिका क्षेत्रात केल्या आहे. नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चाचण्यांसाठी सहकार्य करावे, तसेच कोरोनापासून संरक्षणासाठी लसींचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. कोरोनाच्या जास्त जोखीमीच्या काळात पालिकेने एका दिवसात साडेचार हजार ते पाच हजार चाचण्या पालिका क्षेत्रात केल्या. त्यातही ज्या ठिकाणी कोरोनाबाधित आढळतो त्या इमारतीतील, वसाहतीतील प्रत्येकाच्या चाचण्या करून कोरोनाच्या विषाणूला आहे तेथेच रोखण्यासाठी टारगेटेड टेस्टिंगवर भर दिला जात आहे. सध्या रोज साडेतीन हजार ते चार हजार चाचण्या केल्या जात आहेत. प्रामुख्याने रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, डीमार्ट सारखे मॉल, बाजारपेठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. सद्यस्थितीत रुग्णसंख्या काहीशी कमी झालेली दिसली, तरी कोरोना अद्याप संपलेला नाही हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस घेण्याबरोबरच, मास्क, सतत हात धुणे व सुरक्षित अंतर या कोविड सुरक्षा त्रिसूत्रीचे पालन करणे या गोष्टी नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.