पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (दि. 24) शासनाने जाहीर केलेल्या कर्फ्यूला बर्यापैकी पाठिंबा मिळाला. भाजीपाला पुढील काही दिवस मिळणार नाही या भीतीने लोकांनी भाजी मार्केटमध्ये गर्दी केली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी एसटी सेवा दादरपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. खाजगी अवैध वाहतूक सुरू असल्याने गावाला जाण्यासाठी पूलाखाली कर्फ्यू असतानाही लोकांची गर्दी दिसत होती. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाने राज्यात एसटी, बस, आणि रेल्वे सेवा बंद केली. राज्यात 144 कलम जाहीर करून नागरिकांना गर्दी करू नये, असे आवाहन केले पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्र्यांनी कर्फ्यू जाहीर केला. त्यानंतर ही अनेक ठिकाणी नागरिक बाहेर फिरताना दिसत होते. पुढील काही दिवस भाजी येणार नाही असे चॅनलवरील बातम्यात दाखवल्याने पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये लोकांनी गर्दी होती. त्यातच गुढीपाडव्यासाठी फुले, हार, साखरेच्या गाठ्यांची माळा, आंब्याचे टहाळे आणि गुढीसाठी काठ्या खरेदीसाठी ही झुंबड उडाली होती. पनवेल डेपोतून अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचार्यांसाठी पहाटे 6 वाजल्यापसून वाशी आणि दादरपर्यंत खास गाड्या सोडण्यात येत होत्या त्यामध्ये तुरळक प्रवाशी होते. त्यांचे ओळखपत्र तपासूनच त्यांना प्रवेश दिला जात होता. इतर प्रवाश्यांना गाडीत प्रवेश दिला जात नव्हता. सकाळी तीन तासात 14 दादर आणि 10 वाशी गाड्या सोडण्यात आल्या त्यातून जेमतेम 250 प्रवाशी गेल्याची महिती मिळाली. ठाणे, मुंब्रा, तळोजा, कल्याण आणि अलिबाग जाण्यासाठी प्रवाशी त्याठिकाणी येत होते. पण तेथे जाण्यासाठी गाडी नसल्याने पूलाखालच्या खाजगी अवैध वाहतुकीचा त्यांना सहारा मिळत होता.