Breaking News

मुरूडमध्ये पाच पाळीव जनावरांची कत्तल

पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात कत्तलखोरांचा पोबारा

मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील गारंबी धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील एका झुडुपात गुरुवारी (दि. 27) पहाटे काही अज्ञात इसम पाच पाळीव जनावरांची कत्तल करीत असताना मुरूड पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाला आढळले, मात्र पोलिसांची चाहूल लागताच ते सर्व इसम एका इनोव्हा गाडीत पळून गेले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली, परंतु अज्ञात कत्तलखोरांनी भालगावमार्गे जाणार्‍या रस्त्याला असलेले बेरिकेट्स उडवून फिल्मी स्टाईलने पोबारा केला. मुरूड केळघरमार्गे रोहा हा रस्ता जंगलातून जातो. रात्रीच्या वेळी येथे कोणीही फिरकत नाही. याचा फायदा घेत अज्ञात लोकांनी गुरुवारी पहाटेच्या साडेतीन वाजण्याच्या सुमारास गारंबी धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील एका झुडुपात पाच पाळीव जनावरांची कत्तल केली व मांसाचे तुकडे करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सागर रोहेकर व वैभव साळुंखे हे पोलीस कर्मचारी या भागात गस्ती घालीत होते. त्यांनी त्या लोकांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांना हुलकावणी देत त्या अज्ञात कत्तलखोरांनी सफेद रंगाच्या इनोव्हा (एमएच-04,सीटी-9176) गाडीतून पळ काढला. गस्ती पथकातील दोन्ही पोलिसांनी तात्काळ शीघ्रे नाक्यावर फोन लावून रस्त्याला बेरिकेट्स लावण्यात सांगितले. त्यानुसार तेथे कार्यरत असलेल्या पोलिसांनी मुरूड शहराकडे व रोह्याकडे जाणार्‍या रस्त्यांना बेरिकेट्स लावले. मात्र इनोव्हा गाडीतून पळ काढणार्‍या अज्ञात कत्तलखोरांनी बेरिकेट्स उडवून तेथूनही पोबारा केला. दरम्यान, या घटनेची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून घेण्यात आली असून, मुरूड पोलिसांच्या मदतीला रेवदंडा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कुमक देण्यात आली आहे. या सर्व पोलीस यंत्रणा कसून शोध घेत आहेत. मुरूड तालुक्याच्या विविध भागात पाळीव जनावरांची कत्तल करण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. पाळीव जनावरांची कत्तल करणारे स्वतःची गाडी आणतात, त्यामध्ये जनावरांच्या कत्तलीसाठी हत्यारेसुद्धा असतात. एक दिवस आगोदर धनगरवाडी-पारगांन भागात दोन जनावरांची कत्तल करण्यात आली होती. ती घटना ताजी असतानाच पाच पाळीव जनावरांची कत्तल केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आमच्या या परिसरात पाचवी घटना असून येथील शेतकरी अश्या घडणार्‍या प्रकारमुळे भयग्रस्त झालो आहोत. असे प्रकार थांबावेत अशी समस्त ग्रामस्थांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
-धर्मा हिरवे, ग्रामस्थ, धनगरवाडी-पारगांन, मुरूड

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply